देश कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारे शेतकरी बांधवाच्‍या परिश्रमातुन अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाला. देशाने अन्‍नधान्‍य उत्‍पादनात उच्‍चांक गाठला. परंतु शेतकरी बांधवाच्‍या उत्‍पन्‍नात पाहिजे तशी वाढ झाली नाही. शेतक-यांपेक्षा शेतमालाचा व्‍यापारी मोठे होत आहेत, शेतकरी कुटुबांतीलच एखादी तरी व्‍यक्‍ती शेतमाल व्‍यापारी झाली पाहिजे. आज युवा पिढी शेती व्‍यवसायाकडे येत नाही. शेती करणा-या युवकांना समाजात मानाचे स्‍थान दिले जात नाही. शेती व शेतकरी यांना समाजात आदराचे स्‍थान मिळाले पाहिजे. समाजाची मानसिकता बदलण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन इम्‍फाळ येथील केंद्रीय कृषि विद्यापीठ तसेच राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी यांनी केले.

मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी जयंती निमित्‍त विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक १८ मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्‍याच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. प्रमोद येवले होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी रेणवसिध्‍द लामतुरे, मुख्‍य शिक्षण विस्‍तार अधिकारी डॉ प्रशांत देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करतांना माजी कुलगुरू मा डॉ सुभाष पुरी

माजी कुलगुरू डॉ सुभाष पुरी पुढे म्‍हणाले की, आज देशातील गोदामे अन्‍नधान्‍याने भरली असल्‍याने देशात शांती आहे. अन्‍यथा श्रीलंके सारखी स्थिती झाली असती. श्रीलंकेत कोणताही विचार न करता रासायनिक खत व औषधावर बंदी करून सेंद्रीय शेती करण्‍याचे बंधन शेतक-यांवर लादले, तेथे अन्‍नधान्‍याची मोठी कमतरता नि‍र्माण झाली. सेंद्रीय शेतीचे धोरण अभ्‍यासपुर्णपणे राबविण्‍याची गरज आहे. शेती निविष्‍ठाच्‍या दरात मोठी वाढ होत असुन उत्‍पादन खर्च वाढत आहे. हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होत आहे, यावर संशोधनाच्‍या आधारे मार्ग काढावे लागतील.
अध्‍यक्षीय भाषण करतांना कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले

मान्‍यवरांची नाहेप प्रकल्‍पस भेट