वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेला राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) व मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांच्यासाठी आयओटी प्रणालीचा कृषि क्षेत्रात वापर या विषयावरील ऑनलाईन कार्यशाळेचे दिनांक १७ जुन ते ७ ऑगस्ट दरम्यान करण्‍यात आले असुन या कार्यशाळेचे उदघाटन दिनांक १७ जुन रोजी झाले, उदघाटन कार्यक्रमास मुंबई आयआयटीचे संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रा डॉ कवी आर्य यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे हे होते तर मुंबई आयआयटीचे प्रा. अमित अरोरा यांची विशेष उपस्थिती होती.

डॉ. कवी आर्य यांनी आयओटी व एमबेडेड सिस्टीम्स यांचा कृषि क्षेत्रात वापर यावर मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञान जसे की, इंटरनेट ऑफ थिंगस यांचा वापर करुन काटेकोर कृषि तंत्रज्ञानाची निर्मिती शक्‍य आहे. या तंत्रज्ञानाच्‍या आधारे किटकनाशके, खते, पाणी आदीचा काटेकोर व कार्यक्षम वापर करू शकतो. काटेकोर पाणी व्यवस्थापन, कृषि उपकरणे अधिक स्वयंचलित यंत्रे विकसीत करता येतात. कृषिच्‍या विद्यार्थी व प्राध्यापकांनी कार्यशाळेतील घेतलेल्‍या ज्ञानाचा उपयोग संशोधन कार्यासाठी करावा असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबाबत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, कार्यशाळेचा उपयोग करुन विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रकल्प अहवाल तयार करावेत तर प्राध्यापक अमित अरोरा यांनी मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात प्रशिक्षण कार्यक्रम सचिव डॉ. नरेंद्र खत्री यांनी कार्यशाळेचा उद्देश व आराखडा याची माहिती दिली.

आठ आठवडीय कार्यशाळे दरम्यान विद्यार्थी व प्राध्यापक यांना राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी.एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. राजेश कदम, प्रा. संजय पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, मारोती रणेर आदींनी सहकार्य केले.