वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि जगातील नामांकित वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी (पुलमन, अमेरिका) यांमध्ये दिनांक २ जुलै रोजी कृषि शिक्षण व संशोधन या विषयी सामंजस्य करार झाला, हा कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने पार पडला. या प्रसंगी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय सहयोग विभागाचे उपाध्यक्ष डॉ. असीफ चौधरी, सेंटर फॉर प्रीसीजन अॅन्ड ऑटोमेटेड अॅग्रीकल्चर चे संचालक डॉ. कीन झॅग, अधिष्ठाता (कृषि) डॉ. रीचर्ड झॅग, नवी दिल्ली येथील नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर. सी. अग्रवाल, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख डॉ. प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ डी एन गोखले, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ गोपाळ शिंदे, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. मनोज कारकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शनांत वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे आंतरराष्ट्रीय सहयोग विभागाचे उपाध्यक्ष डॉ. असीफ चौधरी म्हणाले की, जागतिकस्तरावर वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी ही संस्था नावाजलेली संस्था असुन कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन एकुणच जागतिक स्तरावरील कृषि उत्पादकता वाढ होऊ शकते, त्यामुळे या सामंजस्य करारास मानवतेच्या दृष्टीने फार महत्व आहे. मागील पाच वर्षात अमेरिकेसह संपुर्ण जग वेगवेगळ्या जागतिक आव्हानावर काम करीत आहे, त्यात बदलत्या परिस्थितीत कृषि, कृषि शिक्षण व संशोधन यांचे समोरही आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे आव्हाने आहेत. कृषि क्षेत्रातील समास्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाचे कौशल्य विकसित करुन मात करणे शक्य आहे, याकरिता हा सामंजस्य करार अत्यंत महत्वाचा ठरेल. कृषि क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीत उपलब्ध असुन याचा फायदा भारतातील कृषि संशोधक व विद्यार्थी यांना निश्चितच होणार, यामुळे डिजिटल शेतीस चालना मिळणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त करून भारतातील कृषि विषयक विविध शिक्षण व संशोधन जागतिककरण होत असल्याचे सांगितले.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण मनोगतात म्हणाले की, जगातील अग्रगण्य वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीशी परभणी कृषि विद्यापीठाने केलेल्या करारामुळे आधुनिक व डिजिटल शेती तंत्रज्ञानबाबत विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक यांच्या कौशल्य विकासात भर पडणार आहे, त्याचा फायदा मराठवाडा तसेच देशातील कृषि क्षेत्राला होईल. यामुळे परभणी कृषि विद्यापीठात जागतिक पातळीवरील संशोधनास चालना मिळणार आहे.
नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय संचालक डॉ. आर.सी. अग्रवाल यांनी सामंजस्य कराराविषयी समाधान व्यक्त करून राष्ट्रीयस्तरावरील नाहेप प्रकल्पाचे कार्य यावर प्रकाश टाकला. या प्रकल्पाचा विद्यार्थी, संशोधक, शेतकरी यांना निश्चितच फायदा होईल अशी आशा व्यक्त करून परभणी येथील नाहेप प्रकल्पाचे कार्याविषयी समाधान व्यक्त केले.
वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. क्वीन झॅग यांनी आंतरराष्ट्रीय सामंजस्य कराराविषयी सविस्तर माहिती देऊन विविध संशोधन प्रकल्प व संशोधक आदान-प्रदान याविषयी मार्गदर्शन केले. तर वरिष्ठ प्राध्यापक डॉ. रीचर्ड झॅक यांनी विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्प व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सुविधा केंद्र यांची माहिती दिली.
डॉ. मनोज कारकी म्हणाले की, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीत स्वयंचलित यंत्रे, रोबोटिक्सचा कृषि क्षेत्रात उपयोग यावर मोठे संशोधन झाले असुन अनेक संशोधन प्रकल्प चालु आहे, याचा वापर करुन मराठवाडा कृषि क्षेत्रासाठी प्रारुप बनविण्यास होणार असल्याचे सांगितले तर शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांनी या करारामुळे विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना विशेष लाभ होणार असल्याचे म्हणाले.
कार्यक्रमात कुलगुरु मा डॉ अशोक ढवण आणि उपाध्यक्ष डॉ. असीफ चौधरी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. या दोन संस्थामधील सामंजस्य करारामुळे कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान यात ड्रोन तंत्रज्ञान, यंत्रमानव, कृत्रिम बुध्दीमत्ता, प्रीसीजन अॅग्रीकल्चर, स्वयंचलित यंत्रे आदी बाबत एकत्र संशोधन होणार असुन अत्याधूनिक कृषि विषयक शिक्षण व संशोधन याबाबत आदान-प्रदान होणार आहे तसेच दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यात देखिल आदान-प्रदान होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी विद्यापीठातील नाहेप प्रकल्पातील विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा डॉ अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. राजेश कदम, डॉ. भगवान आसेवार, प्रा. संजय पवार, डॉ. मेघा जगताप, डॉ. कैलास डाखोरे आदींनी केले. तर तांत्रिक सहाय्य नाहेपचे इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी, खेमचंद कापगते, डॉ. नरेंद्र खत्री, डॉ. अविनाश काकडे, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. हेमंत रोकडे, इंजी. सचिन कराड, डॉ. शिवराज शिंदे, रहिम खान, शिवानंद शिवपुजे, इंजी. संजीवनी कानवटे इंजी. तनझीम खान, इंजी. गोपाळ रनेर, इंजी. विश्वप्रताप जाधव, प्रदीप मोकाशे, रामदास शिंपले, गंगाधर जाधव, मारोती रनेर, जगदीश माने, मुक्ता शिंदे, रेखा ढगे आदींनी काम पाहिले.
Leave A Comment