परभणी कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक पुरस्कृत डिजिटल शेतीवर आधारित नाहेप प्रकल्प निश्चितच स्त्युत्य उपक्रम असुन यामुळे जागतिक स्तरावरील कृषि संशोधन होत आहे. या प्रकल्पात केवळ देशातील नव्हे तर जगातील नामांकित विदेशी संस्थेशी सामजंस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परभणीचे नाव संपुर्ण देशात होईल, असे प्रतिपादन राज्याचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा श्री भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक ७ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल व मा राज्यपालाचे विशेष सचिव मा श्री राकेश नैथानी यांची विशेष उपस्थिती होती. तर कार्यक्रमास पोलीस अधिक्षक मा श्री जयंत मीना, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
महामहिम राज्यपाल मा श्री भगत सिंह कोश्यारी पुढे म्हणाले की, बदलत्या हवामानात शेतकरी बांधवाची कृषि तंत्रज्ञानाची गरज बदलत आहे, हे कृषि तंत्रज्ञान विकसित करण्याची जबाबदारी कृषि विद्यापीठावरच आहे. शेती यांत्रिकीकरण वाढी करिता प्रयत्न केला पाहिजे. संपुर्ण देश अधिक गतीने पुढे जात आहे, देशाची प्रगती ही कृषि क्षेत्राच्या प्रगतीवरच अवलंबुन आहे. सन 2022 हे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व परभणी कृषि विद्यापीठाच्या स्थापनेचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असुन या वर्षात शेतकरी बांधवाच्या समृध्दी करिता सर्वांनी एकत्र येऊन संस्मरणीय कार्य करूया. संपुर्ण जगातील व देशातील ज्ञान संपादन करून सर्वांच्या विकासाकरिता उपयोग करूया. विद्यापीठात विकसित झालेले कृषि तंत्रज्ञान शेतक-यांच्या बांधावर पोहचले पाहिजे. विद्यापीठास रिक्त पदाची समस्या आहे, शैक्षणिक दर्जा टिकविण्या करिता अध्यापकांच्या पदभरती करिता प्रयत्न केला जाईल. विद्यापीठ राबवित असलेले हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ उपक्रम चांगला उपक्रम असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्या कृषि शिक्षण, कृषि संशोधन व विस्तार शिक्षण उपक्रमाची माहिती सादरीकरणाव्दारे दिली. यात त्यांनी विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या डिजिटल शेती, बीबीएफ तंत्रज्ञान, विविध पिकांच्या शेतक-यांमध्ये प्रचलित असलेल्या विद्यापीठ विकसित वाण, बॉयोमिक्स आदींचा विशेष उल्लेख केला.
याप्रसंगी विद्यापीठाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियान व हरित विद्यापीठ उपक्रमाबाबतची चित्रफित सादर करण्यात आली. माननीय राज्यपाल महोदयांनी उपस्थित शास्त्रज्ञ व प्राध्यापकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्हाण यांनी केले.
माननीय राज्यपाल यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्पास भेट देऊन माहिती घेतली. यात बांबु संशोधन प्रक्षेत्रास भेटी दरम्यान संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, डॉ डब्ल्यु एन नारखेडे, डॉ मदन पेंडके आदीनी माहिती दिली तसेच जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्कृत नाहेप प्रकल्पास भेटी दरम्यान शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रकल्प प्रमुख डॉ गोपाल शिंदे आदींनी माहिती दिली तसेच अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयातील फळे व भाजीपाल प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन महाविद्यालयातील यशस्वी माजी विद्यार्थी, अन्न प्रक्रिया उद्योजक व जिल्हयातील अन्न प्रक्रिया उद्योजक निर्मित उत्पादन दालनास भेट दिली व संवाद साधला यावेळी प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी माहिती दिली. जिजाऊ पदव्युत्तर मुलींचे वसतीगृहातील विविध राज्यातील पदव्युत्तर विद्यार्थींनीशी संवाद साधला व विद्यापीठ ग्रंथालयातील डिजिटल व अद्ययावत ग्रंथालय सुविधा व राष्ट्रपती डॉ एपीजी अब्दुल कलाम प्रेरणा केंद्र यास भेट दिली.
जागतिक बॅक व पुरस्कृत प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत ‘कृषि उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राव्दारे डिजिटल शेती‘ यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्पास भेटी दिली, यावेळी त्यांच्या हस्ते प्रकल्पात विकसित करण्यात आलेल्या कृषि यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित कृषि यंत्रे प्रयोगशाळेचे उदघाटन करण्यात आले तसेच नाहेप प्रकल्प निर्मित ऑफिस अॅडमिनिस्ट्रेशन सॉफ्टवेअर, कृषि हवामान सल्ला अॅप आदीसह विविध मोबाईल अॅप्स व विविध प्रकाशनाचे विमोचन महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले. हरित विद्यापीठ उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय परीसरातील वसंतराव नाईक उद्यानात महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते वडाचे झाड लावुन वृक्षारोपण करण्यात करण्यात आले.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्री महेश वडदकर, मनपा आयुक्त श्री देविदास पवार, उपविभागीय महसुल अधिकारी डॉ संजय कुंडेटकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जयश्री बंगाळे, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, शास्त्रज्ञ व प्राध्यापकवृंद उपस्थित होते.
Leave A Comment