वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), परभणी च्या वतीने “वर्तमान व भविष्यातील कृषि यांत्रिकीकरण” या विषया वरील 18 ते 23 जुन या कालावधीत एक आठवडयाचे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असुन प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक 18 जुन रोजी संपन्न झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु मा. डॉ. व्यंकट मायंदे होते. सदरील कार्यक्रमात भारतीय कृषि अभियांत्रिकी संघटनेचे अध्यक्ष डॉ. इंद्रामनी मिश्रा, नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, डॉ. मनजित सिंग, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे आदी प्रमुख सहभाग होता.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. डॉ अशोक ढवण यांनी डिजीटल यांत्रिकीरणावर तरुण शास्त्रज्ञांनी पारंगत होऊन त्यांचा जास्तीत जास्त शेतक-यां पर्यंत प्रसार करावा असा सल्ला दिला तर शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याकरीता कृषि यांत्रिकीकरणाचे महत्व या विषयावर मा. डॉ.व्यंकट मायंदे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. इंद्रामनी मिश्रा यांनी कृषि यांत्रिकी गरज यावर मार्गदर्शन केले तर नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार यांनी वाढत्या लोकसंख्येचा अन्न सुरक्षिततेसाठी कृषि यांत्रिकी करणाची गरज असल्याचे सांगितले.
डॉ. मनजित सिंग यांनी कोरोना महामारीच्या काळात कृषि यांत्रिकी करणाच्या वापरावर भर देण्याचे विशद केले. शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य, डॉ. उदय खोडके, प्रकल्पाचे प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे, उपप्रकल्प संचालक प्रा. संजय पवार आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरील प्रशिक्षणात देश व विदेशातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असुन यात अमेरीकेतील वॉशिंग्टन स्टेट विद्यापीठ शास्त्रज्ञ, पंजाब कृषि विद्यापीठ, भा.कृ.अ.प.अंतर्गत केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान भोपाळ, केंद्रीय कोरडवाहु शेती अनुसंधान संस्था हैद्राबाद, जी.बी.पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर, आय.आय.एस.आर.लखनऊ, आय.आय.टी. खरगपुर येथील प्रमुख शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रशिक्षाणात देशातील 22 राज्या मधुन 423 तर इतर 10 देशातील 17 प्रशिणार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे. यात भारतातील विविध कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थी, प्राध्यापक व विविध कृषि संस्थेतील शास्त्रज्ञ यांचा सहभाग आहे. सदरील परिसंवाद नाहेप प्रकल्पांतर्गत घेण्यात येत असुन कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प अन्वेषक डॉ.गोपाळ शिंदे प्रा.संजय पवार, आयोजक प्रा. दयानंद टेकाळे, प्रा.दत्तात्रय पाटील आदी परिश्रम घेत आहेत. सुत्रसंचालन डॉ. विना भालेराव यांनी केले तर आभार प्रा. दत्तात्रय पाटील यांनी मानले. तांत्रिक सहाय्य डॉ. रश्मी बंगाळे, डॉ. अविनाश काकडे, इंजि. शिवानंद शिवपुजे, इंजि. शैलेश शिंदे, इंजि. गोपाळ रणेर आदींनी केले.
Leave A Comment