पिकांचे उत्पादन मोठया प्रमाणावर दर्जेदार बियाणे उपलब्धता यावरच अवलंबुन आहे. परभणी कृषी विद्यापीठ विकसित विविध पिकांच्या वाणास शेतकरी बांधवामध्ये मोठी मागणी आहे. सदर वाणांचे बीजोत्पादन वाढीकरिता महाराष्ट्र शासन, कृषि विभाग, कृषि विद्यापीठ, बियाणे कंपन्या आणि शेतकरी यांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची गरज आहे. विद्यापीठ खासगी बियाणे उत्पादक कंपन्यासोबत सार्वजनिक – खासगी भागादारी तत्वावर बीजोत्पादन वाढीकरिता प्रयत्न करित आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्या विद्यमाने “विविध पिकांचे गुणवत्तापुर्वक बीजोत्पादन व प्रमाणीकरण” या विषयावर एक आठवडीय राष्ट्रीय प्रशिक्षणाचे दिनांक १० ते १५ ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले असुन दिनांक ११ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणाच्या उदघाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अकोला येथील महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संतोष आळसे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, पुणे येथील कांदा व लसुण संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजय महाजन, केहाळ येथील प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर घुगे, प्राचार्य डॉ सय्यद ईस्माइल, आयोजक विभाग प्रमुख (विस्तार शिक्षण) डॉ राजेश कदम, डॉ गोदावरी पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि पुढे म्हणाले की, शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर इतर क्षेत्राच्या तुलनेत कमी असुन हा वापर वाढण्याकरिता कृषी विद्यापीठ कार्य करीत आहे. काटेकोर शेती मध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अत्यावश्यक आहे. शेतकरी हा समाजातील एक प्रामाणिक व्यक्ती असुन सर्वांनी एकत्रितरित्या शेतकरी कल्याण करिता काम करावे लागेल.
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संतोष आळसे म्हणाले की, दर्जेदार बीजोत्पादन करतांना अनेक समस्या येतात, हवामान बदलामुळे अवेळी पडणार पाऊसामुळे बीजोत्पादनात मोठा परिणाम होत आहे. बीजोत्पादनात मजुरांचीही समस्या आहे, यावर डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य आहे, यावर संशोधनाची गरज आहे. मार्गदर्शनात डॉ. विजय महाजन म्हणाले की, कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढत आहे, याचा लाभ घेण्याकरिता शेतकरी बांधवांना गटशेतीच्या माध्यमातुन एकत्र येण्याची आवश्यकता आहे. प्रगतशील शेतकरी श्री. मधुकर घुगे यांनी भुईमुग बीजोत्पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.
प्रास्ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी दर्जेदार बियाणे पुरवठयाकरिता बियाणे प्रमाणीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. प्रशिक्षणाच्या आयोजिका डॉ गोदावरी पवार यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. कार्यक्रमात माननीय कुलगुरू यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी श्री पंडितराव थोरात आणि माजी कृषि विद्यावेत्ता डॉ उदय आळसे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ राजेश कदम यांनी मानले.
सदर प्रशिक्षण बीजोत्पादन व या क्षेत्रातील संधी संबंधीत कौशल्य वृध्दिंगत करणे हा उद्देश ठेवुन कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर, आचार्य विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ तथा कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याकरिता आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक डॉ. राजेश कदम, डॉ. गोदावरी पवार, इंजी. संजय पवार व डॉ. मेघा जगताप यांनी केले आहे. प्रशिक्षणात राष्ट्रीय पातळीवरील बीजोत्पादन क्षेत्रातील नामांकित २४ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन प्रशिक्षणासाठी विविध महाविद्यालयातुन पदव्युत्तर,आचार्य विद्यार्थी, प्राध्या पक, विद्यापीठ शास्त्रज्ञ तथा कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी नोंदणी केलेली आहे.
Leave A Comment