वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषिविद्या विभागाद्वारे व राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सहकार्याने मागासवर्गीय कृषि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विषयज्ञान विकासासाठी “एकात्मिक तण व्यवस्थापन तथा तणनाशकाचा कार्यक्षम वापर” या विषयावर तीन दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण दि. 23 ते 25 मार्च दरम्यान आयोजित केले असुन प्रशिक्षणाचा उदघाटन दिनांक 23 मार्च रोजी झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन जबलपूर येथील भारतीय तण विज्ञान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुशिलकुमार हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी परभणी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल हे होते. आयोजक कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. आसेवार, नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थित होते.
मार्गदर्शनात डॉ. सुशिलकुमार म्हणाले की, सद्यस्थितीत तणामुळे उदभवणारे पीक नुकसान व तणनाशकांच्या अति वापराने होणारे दुष्परिणाम, सेंद्रीय शेतीमध्ये तण व्यवस्थापन, तणनाशकांना प्रतीकारक करणारी तणे आदी बाबींचा विचार केल्यास एकात्मिक तण व्यवस्थापन हाच योग्य पर्याय आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. सय्यद इस्माईल यांनी तणनाशकांच्या अयोग्य वापरामुळे जमीनीतील सुक्ष्म जीवावर विपरीत परिणाम घडवुन जमिनीचे जैविक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते, त्यामुळे तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक डॉ. बी.व्ही. आसेवार प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन सचिव डॉ. सुनिता पवार यांनी केले तर आभार डॉ. मिर्झा आय.ए.बी यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असुन प्रशिक्षणात कौइमतुर येथील तामिळनाडु कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. चिन्ना मुथु, डॉ. मुरली अर्थनारी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. सुनिता, अकोला कृषि विद्यापीठातील तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जे. पी. देशमुख, संशोधन उपसंचालक डॉ. ए.एस. जाधव, वनस्पती शरीर क्रियाशास्त्रज्ञ डॉ. सुधीर आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवसीय प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना तण व्यवस्थापन या विषयातील राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तरी कृषिच्या विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडुन आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विशाल अवसरमल, डॉ. मेघा जगताप, इंजि. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, रामदास शिंपले आदींनी सहकार्य केले.
Leave A Comment