महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक–यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणा–या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीची ४९ वी बैठक दिनांक २४ ते ३० डिसेंबर दरम्यान आभासी माध्यमातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. सदरिल बैठकीचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री तथा कृषि विद्यापीठेचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ डिसेंबर रोजी आभासी माध्यमा व्दारे होणार आहे. बैठकीस महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री प्रकाश आबिटकर, राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा श्री एकनाथ डवले, कृषि परिषदेचे महासंचालक मा श्री विश्वजीत माने, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. विलास भाले, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. संजय सावंत, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे बैठकीचे स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती वनामकृविचे संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दिली आहे.
सदरिल बैठकीत राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेल्या संशोधनातुन शेतक–यांना शाश्वत उत्पादन देणारे विविध पिकांचे सुधारीत व संकरीत वाण, पशुधनाच्या सुधारीत प्रजाती, पीक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, मृद व जलसंधारण आदीसह अनेक महत्वाच्या शिफारसीबाबत बैठकीच्या माध्यमातून विचारमंथन होऊन शेतक-यांसाठी प्रसारीत केल्या जातात. शेतक–यांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदरिल बैठकीत विविध पिकांचे अधिक उत्पादन देणारे नवीन वाणासह कृषि तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार आहेत. बैठकीच्या तांत्रिक चर्चासत्रात ऑनलाईन माध्यमाव्दारे चारही कृषि विद्यापीठातील साधारणत: ३०० कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार आहे. प्रथम सत्रामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत असलेल्या महाराष्ट्रातील संशोधन संस्थांचे संचालक तसेच शास्त्रज्ञ, राज्यशासनाच्या कृषि संलग्न विविध विभागाचे अधिकारी, कृषि विषयक खात्याचे प्रमुखांचे व राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक अहवालाचे सादरीकरण करणार आहेत.
तांत्रिक सत्राच्या एकुण १२ गटांमार्फत विविध शिफारशीवर विचारमंथन होणार आहे. तांत्रिक सत्राच्या पहिल्या गटात शेत पीके (पीक सुधारणा व तंत्रज्ञान सुधारात्मक व्युहरचना) यावर शिफारशी प्रसारीत होणार आहेत. नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, उद्यानविद्या आणि पशु व मत्स्य विज्ञान या वरील शिफारशी अनुक्रमे गट क्र. २, ३ व ४ मध्ये मांडण्यात येणार आहेत. गट क्र. ५ मध्ये मुलभुत शास्त्रे, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत तर गट क्रमांक ६, ७ व ८ मध्ये पीक संरक्षण, कृषि अभियांत्रिकी व सामाजीक शास्त्र या विषयावरील शिफारशी मांडण्यात येणार आहेत. शेती पीके आणि उद्यानविद्या वाण प्रसारण तसेच कृषि यंत्रे व अवजारे प्रसारणावर चर्चा गट क्र. ९, १० व ११ मध्ये होणार आहे. जैविक ताण सहन करणारे स्त्रोत नोंदणी प्रस्ताव गट क्र. १२ मध्ये मांडण्यात येणार आहे.
चारही कृषि विद्यापीठाच्या एकुण २२० शिफारशींचे होणार सादरीकरण
चारही कृषि विद्यापीठांच्या एकुण २२० शिफारशींचे सादरीकरण करण्यात येणार असुन यात १२ विविध पिकांच्या वाण व १४ कृषि अवजारांचा समावेश आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांमार्फत संशोधनावर आधारीत एकुण ५७ शिफारशी बैठकीत सादर करण्यात येणार असुन यात तीन प्रसारीत वाण, सात कृषि अवजारे व इतर कृषि तंत्रज्ञान शिफारशींचा समावेश आहे तर राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या एकुण ८१ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ७ प्रसारित वाण व १ कृषि अवजारांचा समावेश आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या एकुण ४८ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात दोन प्रसारित वाण व ६ कृषि अवजारांचा समावेश आहे तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या एकुण ३४ शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.
Leave A Comment