सकल देशांतर्गत उत्पादनात शेती क्षेत्राचा वाटा कमी होत असुन ग्रामीण भागातील ७० टक्के लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबुन आहे. मनुष्याचा जीवनातील प्रत्येक क्षेत्र डिजिटल तंत्रज्ञानाने व्यापले जात आहे. शेतीतील अनेक कष्टप्रत कामे डिजिटल तंत्रज्ञानाने सोपी होऊ शकतात, हे डिजिटल तंत्रज्ञान शेतकरी बांधवाना वापरण्याकरिता सोपे व किफायशीर झाले पाहिजे. शेती, उद्योग, निर्मिती व सेवा क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान व स्वयंचलनाचा वापर वाढणार असुन याकरिता कुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याची गरज आहे. याक्षेत्रात नौकरीच्या मोठया संधी प्राप्त होणार असुन डिजिटल तंत्रज्ञानामध्ये कुशल मनुष्यबळ निर्मितीत नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातुन देशात परभणी कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. भविष्यात डिजिटल शेतीकरिता नाहेप प्रकल्प देशात नेतृत्व करेल, असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ उद्धव भोसले यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) च्या वतीने दिनांक १४ ते १६ मार्च दरम्यान शेती स्वयंचलनातील प्रगत डिजिटल तंत्रज्ञान यावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यशाळेचे उदघाटनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन अहमदाबाद येथील अंतराळ उपयोग केंद्राचे अंतराळ शास्त्रज्ञ मा डॉ राहुल निगम आणि राष्ट्रीय समन्वयक मा डॉ प्रभात कुमार उपस्थित होते. व्यासपीठावर अमेरिकेतील मेरिलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ रघु मुरदुगुड्डे, आयआयटी मुंबईचे शास्त्रज्ञ डॉ पेनन चिन्नास्वामी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, नाहेप प्रकल्प मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे, आयोजन सचिव डॉ कैलास डाखारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, भारतीय शेतीचा प्रवास पारंपारिक शेती कडुन डिजिटल शेती कडे होत आहे. देशात नवीन शैक्षणिक धोरणास सुरूवात झाली असुन यात आंतरशाखीय शिक्षणास महत्व देण्यात आले असुन यादृष्टीने नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातुन परभणी कृषि विद्यापीठाने अनेक विद्याशाखेशी संबंधीत नामांकित संस्थे बरोबर साम्यजंस्य करार केले आहेत. शेतीत डिजिटल तंत्रज्ञान संशोधनास लागणारी सुविधा नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातुन विकसित करण्यात आली आहे. शेतीत नैसर्गिक साधनसंपत्तीचा होणारा –हास आणि हवामान बदल ही दोन मुख्य समस्या असुन डिजिटल तंत्रज्ञानाने यावर मात करणे शक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मार्गदर्शनात इस्त्रो शास्त्रज्ञ मा डॉ राहुल निगम म्हणाले की, शेतीत मंजुरीवर मोठया प्रमाणात खर्च होत असुन किड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतमालाचा मोठे नुकसान होते, या समस्यावर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन शेतीत स्वयंचलनावदारे मात करू शकतो. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी पाण्यावर तग धरणा-या पिकांच्या जाती विकसित करणे शक्य असुन शेतीत पाण्याचा कार्यक्षम वापर करणे शक्य होईल. आज जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान भारतात सहज उपलब्ध होत आहे. शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन क्रांती होणार असुन डिजिटल तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर वाढीकरिता कुशल मनुष्यबळाची गरज लागणार आहे. कृषिच्या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान व प्रगत डिजिटल तंत्रज्ञान अवगत करून स्वत: कृषि उद्योजक बनावे. नौकरदार होण्यापेक्षा नौकरी देणारे उद्योजक बना, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमात अमेरिकेतील मेरिलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ रघु मुरदुगुड्डे, आयआयटी मुंबईचे शास्त्रज्ञ डॉ पेनन चिन्नास्वामी यांनीही मार्गदर्शन केले. मुख्य आयोजक प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबाबत माहिती दिली तर आयोजन सचिव डॉ कैलास डाखोरे यांनी कार्यशाळा आयोजनाबाबत भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ सुनिता पवार यांनी मानले. सदरिल तीन दिवसीय कार्यशाळेत शेतीचे स्वयंचलिकरण, कृषि यंत्रमानव, कृषि ड्रोन, शेतीत इटरनेट ऑफ थिंग्स चा वापर, कृत्रिम बुध्दीमत्ता, माहिती तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोग, अन्न प्रक्रियेतील स्वयंचलिकरण, स्वयंचलित शेतीयंत्र आदी विषयावर अमेरिका, फ्लोरिडा, फिलिपाईन्स तसेच देशातील नामांकित संस्थेतील शास्त्रज्ञ डिजिटल शेतीतील विविध विषयावर मार्गदर्शन करणार असुन देशातील विविध विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ व विद्यार्थी कार्यशाळेत सहभागी झाले आहेत. कार्यशाळेचे मुख्य आयोजक प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे, आयोजन सचिव डॉ कैलास डाखोरे असुन, कार्यशाळेचे समन्वयक प्राचार्य डॉ यु एम खोडके, डॉ आर पी कदम, इंनि. एस एन पवार, डॉ एस आर गरूड आदीसह नाहेप प्रकल्पातील शास्त्रज्ञ परिश्रम घेत आहेत.
Leave A Comment