नवीन शैक्षणिक धोरणानुसार कृषि शिक्षणात बदल होत असुन यामुळे संपुर्ण कृषि शिक्षण परिसंस्थेत आमुलाग्र बदल होत आहेत. दर्जेदार शिक्षणाकरिता देशातील कृषि विद्यापीठे अनेक विदेशीतील व देशातील नामांकीत संस्थेशी सामंजस्य करार करित आहेत, याचा लाभ विद्यार्थ्यांना होणार आहे. नाहेप प्रकल्पाच्या माध्यमातुन विद्यार्थीमधील शेती उपयुक्त डिजिटल तंत्रज्ञान व कौशल्य वृध्दींगत होत आहेत. देशातील कृषि विद्यापीठ जागतिक दर्जेचे विद्यापीठे झाली पाहिजे. देशातील कृषी विद्यापीठे स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण झाली पाहिजे, असे प्रतिपादन नाहेप प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक तथा आयसीएआरचे उपमहासंचालक मा डॉ आर सी अग्रवाल यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) च्या विविध स्मार्ट प्रयोगशाळेचे आणि उपक्रमाचे मा डॉ आर सी अग्रवाल यांच्या हस्ते दिनांक ३ मे रोजी उदघाटन करण्यात आले, याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्रकल्प अन्वेषक डॉ गोपाल शिंदे, प्राचार्य डॉ उदय खोडके, पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ एस एस ओहल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ आर सी अग्रवाल पुढे म्हणाले की, ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातुन समाजातील शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपुर्ण देशात व्हर्च्युअल क्लासरूम व अॅग्रीदीक्षा वेब एज्युकेशन चॅनलमुळे कृषी शिक्षणाची गुणवत्ता वाढणार आहे. यामुळे देशातील व परदेशातील चांगल्या कृषी शास्त्रज्ञ व प्राध्यापकांची व्याख्याने देशभरातील कृषी पदवीधरांना एकाच प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. देशातील अनेक कृषी विद्यापीठात मनुष्यबळाची कमतरता असुन व्हर्च्युअल क्लासरूम मुळे काही प्रमाणात यावर मात करणे शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त करून परभणी कृषि विद्यापीठातील नाहेप प्रकल्पातील राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, करोना रोगाच्या प्रादुर्भाव व लॉकडाऊन परिस्थितीत नाहेप प्रकल्पामुळे ऑनलाईन माध्यमातुन परभणी कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रसाराचे आणि अध्यापनाचे कार्य अविरत चालु राहीले. नाहेप अंतर्गत वॉशिग्टन स्टेट विद्यापीठ, आयआयटी खरगपुर, आयआयटी मुंबई आदी जगातील अग्रगण्य संस्थाशी सामजंस्य करार मुळे विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांना जागतिक दर्जेचे शिक्षणाची संधी प्राप्त होणार आहे.
याप्रसंगी नाहेप प्रकल्पा अंतर्गत विकसित केलेल्या व्हर्च्युअल क्लासरूम व अॅग्रीदीक्षा वेब एज्युकेशन चॅनल, स्वयंचलित हवामान माहिती यंत्रणा, स्मार्ट शेती यंत्र कार्यशाळा, स्मार्ट शेडनेट, अत्याधुनिक स्मार्ट पॉलीहाऊस, एआय अॅन्ड मेच्याट्रोनिक्स लॅब, स्वयंचलित अन्न प्रक्रिया प्रयोगशाळा, तणनाशक मोबाइल अॅप, ईएसपी मोबाईल अॅप, आंतरराष्ट्रीय नियतकालिका आदींचे उदघाटन मा डॉ आर सी अग्रवाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शिक्षण व संशोधनाकरिता आभासी माध्यमातुन आयआयटी खरगपुर यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला, यावेळी आयआयटी खरगपुर चे संचालक डॉ व्ही के तिवारी, डॉ टि के भट्टाचार्य, डॉ राजेंद्र माचेवरम आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ व्ही के तिवारी म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीतील अनेक समस्या सुटू शकतात, सदर सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संशोधनास मदत होणार आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ गोपाल शिंदे परभणी कृषि विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या नाहेप प्रकल्पातील विविध उपक्रमाची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ भगवान आसेवार, डॉ राजेश कदम, डॉ कल्याण आपेट, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ प्रविण वैदय, डॉ नेहारकर आदीसह विद्यापीठातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ गोदावरी पवार, डॉ दयानंद टेकाळे, डॉ बी एस आगरकर, डॉ मेघा सुर्यवंशी, डॉ संतोष फुलारी, डॉ सुनिता पवार आदीसह नाहेप प्रकल्पातील संशोधक, अभियंता व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Leave A Comment