वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) व भारतीय प्रौद्योगिकी संस्था (आयआयटी, पवई) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20 ते 25 जानेवारी दरम्यान रिमोट सेन्सींग व जीआयएस तंत्रज्ञानाचा कृषि क्षेत्रात वापर यावरील एक आठवडा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण वर्गाचा समारोप दिनांक 25 जानेवारी रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन आयआयटी पवई, मुंबई येथील डॉ. पेन्नन चिन्नासामी हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भगवान आसेवार हे होती. आयोजक डॉ. राजेश कदम, प्रा. संजय पवार, डॉ. प्रविण वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. पेन्नन चिन्नासामी म्हणाले की, कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी वेगवेगळया प्रकारच्या संख्यात्मक माहितीची आवश्यकता असते. ही संख्यात्मक माहिती वेळेवर उपलब्ध होण्याकरिता रीमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा वापर संशोधनासाठी फायदेशीर ठरु शकतो. कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी विद्यार्थी व शास्त्रज्ञांनी जीआयएस व रीमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रशिक्षणात डॉ. पेन्नन चिन्नासामी यांनी क्युजीआयएस प्रणालीचा उपयोग, शेतीचे नकाशे काढणे, उपग्रह प्रतिमांचा उपयोग करणे, ड्रोन प्रतिमांचा शेती संशोधनासाठी वापर करणे आदीबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थी व शास्त्रज्ञांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करून मराठवाडयातील कोरडवाहू शेती संशोधनासाठी रीमोट सेन्सींग तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.
नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाद्वारे प्रशिक्षीत संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना देशपातळीवर विविध संशोधन कार्यपटलावर संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. वनामकृवि व आयआयटी येथील संशोधक प्राध्यापक यांच्या मदतीने सर्व विभागनिहाय डिजीटल शेती करीता भौगोलिक नकाशे व शेती उपयुक्त माहिती तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रशिक्षणात 40 पदव्युत्तर विद्यार्थी व शास्त्रज्ञ यांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक आयआयटी पवई, मुंबई येथील जागतिक कीर्तीचे नामांकीत प्राध्यापक डॉ. पेन्नन चिन्नासामी आणि त्यांचे सहकारी श्री. शिवानंद नलगिरे यांनी मार्गदर्शन केले.
श्री. राम मोरे, डॉ. कैलास डाखोरे, श्रीमती भाग्यलक्ष्मी आदीं प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षणाविषयी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. मेघा जगताप यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन डॉ. अनिकेत वाईकर यांनी केले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी डॉ. अनिकेत वाईकर, इंजि. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, इंजि. खेमचंद कापगते, इंजि. नरेंद्र खत्री, डॉ. हेमंत रोकडे, इंजि. शिवानंद शिवपुजे, रहिम खान, इंजि. गोपाळ रनेर, इंजि. विश्वप्रताप जाधव, इंजि. अपुर्वा देशमुख, रामदास शिंपले, श्रीमती रेखा ढगे, जगदीश माने, मारोती रनेर, गंगाधर जाधव आदींनी सहकार्य केले.
Leave A Comment