बदलत्‍या हवामानाचा कोरडवाहु शेतीत पिक उत्‍पादनावर मोठा परिणाम होत आहे, शाश्‍वत उत्‍पादनाकरिता डिजिटल साधने व कृत्रिम बुध्‍दीमत्‍ताच्‍या मदतीने संशोधनाच्‍या आधारे वाढते तापमान, आर्द्रता व जमीनीतील क्षारता आदी अजैविक ताणास सहनशील वाण निर्मिती करण्‍याची गरज असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आाणि जागतिक बॅक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्प (नाहेप), भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने २९ जुन ते ३ जुलै दरम्‍यान डिजिटल साधनाच्‍या माध्‍यमातुन पिकांच्या अजैविक ताण व्‍यवस्‍थापन याविषया वरील आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाच्‍या उदघाटनाप्रसंगी (२९ जुन रोजी) ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन धारवाड (कर्नाटक) येथील कृषी विज्ञान विद्यापीठ कुलगुरु मा. डॉ. एम. बी. चेटटी, ऑस्ट्रेलिया येथील युनीव्हर्सीटी ऑफ वेस्टर्नचे संचालक मा. प्रा. कदमबोट सिद्यीकी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरु मा. डॉ. एम. बी. चेटटी यांनी हवामान बदलामुळे शेती उत्‍पादन वाढीवर मर्यादा आल्‍या असुन पिक विविध अजैविक ताणाचा परिणाम होत आहे. हवामान अनुकुल तंत्रज्ञान विकसित करण्‍याकरिता  वनस्‍पती अनुवंशिक शास्‍त्र संशोधनात जैव तंत्रज्ञान व बायोइन्फॉरमॅटिक्स तंत्राचा वापर करावा, असा सल्‍ला दिला.

मा. प्रा. कदमबोट सिद्यीकी आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानाचा जागतिक पातळीवर कृषि क्षेत्रावर होत असुन वाढत्‍या जागतिक लोकसंख्‍येस अन्‍न सुरक्षेचे मोठे आव्‍हान आपल्‍या समोर आहे. कृषि बुध्‍दीमत्‍ता व डिजिटल तंत्रज्ञान वापर करून काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित करावे लागेल, असे ते म्‍हणाले.

यावेळी नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ प्रभात कुमार व शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनीही मार्गदर्शन केले. नाहेप प्रकल्‍पाबाबत डॉ गोपाल शिंदे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ गोदावरी पवार यांनी केले तर आभार डॉ राजेश कदम यांनी मानले. प्रशिक्षणात अमेरिका, जपान, ब्राझील, नेपाळ, पाकिस्‍तान, इस्त्राईल, फिलिपीन्स, पोर्तुगाल, अफगाणिस्तान, घाना, केनिया, नायजेरिया आदीसह ४० आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थीचा सहभागी आहे. प्रशिक्षणाचे आयोजन नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे, विभाग प्रमुख (विस्‍तार शिक्षण) तथा प्रकल्‍प उपअन्वेषक डॉ. राजेश कदम, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. के. एस. बेग, आयोजन सचिव डॉ. गोदावरी पवार आदींनी केले आहे.

सदरील ऑनलाईन प्रशिक्षणात सहभागी कृषी वनस्पती शरीरक्रिया शास्त्राशी निगडीत संशोधक, प्राध्यापक व आचार्य विद्यार्थी यांना जागतिक हवामान बदलाला अनुसरुन विविध पिकांचे नवीन वाणांची निर्मिती व संशोधन करतांना पिकांची शरीरक्रियाशास्त्र समजुन घेऊन होणा-यां बदलाची आधुनिक डिजीटल साधनांची ओळख, व संशोधनात त्यांचा अंतर्भाव आदींबाबत देश – विदेशातील शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यात ऑस्ट्रेलिया येथील वेस्टर्न युनीव्हर्सीटीचे संचालक प्रा. कदमबोट सिद्यीकी, अमेरीका येथील कान्स स्टेट युनीव्हर्सीटीचे डॉ. पी. व्ही. वरप्रसाद, अमेरिकास्थित भारतीय कृषि अनुसंधान परिषदे माजी विभाग प्रमुख डॉ पी. एस. देशमुख, केरळ येथील सीपीसीआरआयचे निवृत्त संचालक डॉ. वेलामुर राजगोपाल, आयसीएआरतील वनस्पती शरीरक्रीया शास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. व्ही. चीन्नुस्वामी, आनुवंशिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सी. भारव्दाज, हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्थेचे डॉ. एम. माहेश्वरी, युनिव्हरसीटी ऑफ इलीनीऑस (अमेरीका) चे शास्‍त्रज्ञ डॉ. नितीन कदम, डॉ. पुसा (बिहार) येथील राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापिठाचे डॉ राजीव बहुगुना, जपान येथील वरिष्ठ संशोधक डॉ. व्ही. देशमुख आदींचा समावेश आहे.

Posted by promkvparbhani.blogspot.com at 4:56 PM

Email ThisBlogThis!Share to TwitterShare to FacebookShare to Pinterest

 

वनामकृवित एकात्मिक तण व्यवस्थापन यावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रक्लप (नाहेप) व कृषि विद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक 24 जुन रोजी तणनाशकांचा कार्यक्षम वापर व एकात्मिक तण व्यवस्थापन या विषयांवर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्‍या  उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, लातूर विभागीय कृषि सहसंचालक डॉ. टी. एन. जगताप, औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ. डी.एल. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. धर्मराज गोखले यांनी पिक लागवडीत तण व्यवस्थापणास मोठे महत्‍व असुन तणामुळे विविध पिकामध्ये 30 ते 70 टक्क्यापर्यंत पिक उत्पादनात घट येत असल्‍याचे सांगितले तर   डॉ. देवराव देवसरकर यांनी रासायणिक तणनाशकाचा वापर आवश्यक ठिकाणी करुन एकात्मीक तण व्यवस्थापावर जास्त भर देण्‍याचा सल्‍ला दिला. भाषणात डॉ. टी. एन. जगताप यांनी सद्याच्या परिस्थीतीत सोयाबीनची उगवणुक कमी झाल्यामुळे ज्या शेतक-यांनी तणनाशकाचा वापर केला असेल त्याच ठिकाणी इतर कोणती पिके घेता येतील यावर शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन करावे असे सांगितले तर डॉ. डी. एल. जाधव यांनी तण खाई धन या म्हणी प्रमाणे तणाचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे असल्‍याचे सांगितले.

तांत्रीक सत्रात तणनाशकांचा अचुक व कार्यक्षम वापर यावर डॉ. सुनीता पवार यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. अशोक जाधव यांनी नगदी पीके ऊस, हळद, भाजीपाला, फळपिकातील तण व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. ऑनलाईन प्रशिक्षणात 450 प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विविध कृषि विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्याक्रमाचे विद्यार्था, प्राध्यापक,   शेतकरी, विविध कृषि संस्थेतील शास्त्रज्ञ आदींनी सहभाग नोदंवीला. प्रशिक्षणाचे आयोजन कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. व्ही. आसेवार होते. प्रशिक्षणात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या  तण व्यवस्थापनावरील प्रश्नांची उत्तर दिले. प्रशिक्षणाचे प्रास्तविक डॉ. बि. व्ही. आसेवार यांनी केले तर आभार डॉ. सुनिता पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तांत्रीक नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांच्‍यासह डॉ. स्वाती मुंढे, डॉ. रश्मी बंगाळे, डॉ. अविनाश काकडे आदींनी पुढाकार घेतला.